दिनांक: २४ एप्रिल २०२०
प्रति,
मा. उद्धव ठाकरे,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
मुंबई.
मा. महोदय,
विषय :- संचारबंदी व लॉकडाऊन च्या परिस्थितीत *दारूची दुकाने न उघडण्याची विनंती* व व्यसनमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊले उचलण्याकरिता निवेदन.
जय महाराष्ट्र साहेब,
कोरोना च्या संकट समर्थपणे हाताळणाऱ्या देशातील बोटावर मोजता येणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत आपला अग्रक्रम लागतो. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. वैद्यकीय विभाग, पोलिस प्रशासन विभाग, स्वच्छता कर्मचारी व एकुणच ही सर्व यंत्रणा एका विशिष्ट ध्येयासाठी अहोरात्र काम करीत आहेत. या सर्वांचे शब्दांमध्ये कौतुक होवु शकत नाही.
आपल्या राज्यात लॉकडाऊनचा निर्णय घेतांना सर्व प्रकारची देशी, विदेशी दारुची दुकाने त्वरीत बंद करण्याचा निर्णय घेतला याबद्दलही आपले विशेष कौतुक व अभिनंदन आम्ही करीत आहोत. याचा सकारात्मक परिणाम खुप मोठा आहे. दारु दुकाने बंद ठेवल्यामुळे कोरोणाच्या प्रसाराला मोठ्या प्रमाणाला आळा बसलेला आहे. त्याचप्रमाणे दारुवर खर्च होणारा पैसा कुटुंबाच्या भरणपोषणासाठी खर्च झाल्यामुळे भुकेचा उद्रेकही काही प्रमाणांत कमी झाल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. यातुन अनेक व्यसनाधीन व्यक्ती कायमचे निर्व्यसनी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे जे की अत्यंत समाधानाची बाब आहे. असे असतांना राज्याचे आरोग्य मंत्री मा. राजेशजी टोपे यांनी मात्र दारुचे दुकाने सुरु करण्याचे संकेत दिले आहेत व मा. राज ठाकरे यांनी ही वाईन शॉप सुरु करावेत ही मागणी केली आहे ती मागणी भविष्यासाठी अतिशय घातक ठरु शकते. कुठल्याही व्यसनामुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात कमी होत असते. जागतीक आरोग्य संघटनेने देखिल व्यसनाला विरोध केलेला आहे आणि कुठलेही व्यसन हे अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट नसतांना दारुबंदी उठवणे दुष्परीणामकारक ठरेल असे आमचे स्पष्ट मत आहे.
महसूलासाठी वाईन शॉप, हे नीतिमत्ताचे पुराण नसून राज्यसरकारचे नितिमान कर्तव्य आहे ! त्याचप्रमाणे आज हाताला काम नसताना गरीब कुटुंबातील महिला उरलेले पैसे जपून वापरत संसार चालवत आहेत.अशा स्थितीत दारू दुकाने सुरू झाली तर व्यसनी पुरुष ती बचत संपवून टाकतील प्रसंगी घरातील धान्य विकून दारू पितील व महिला अत्याचाराचे प्रमाण त्यातून वाढेल. राज ठाकरे यांनी गरीब कुटुंबावरील या परिणामाचा फारसा विचार केलेला नाही.
राज्याच्या तिजोरीत खडखडात असतांना महसुलासाठी वाईन शॉप सुरु केले पाहिजेत ही मागणी प्रथमदर्शनी योग्य वाटत असली तरी त्याचे दुष्परिणाम हे भयंकर होण्याची शक्यता आहेत.
एका सर्वक्षणानुसार जर दारू पासून 10/ रुपये उत्पन्न मिळत असेल तर त्याचे जे समाजात होणारे जे दुष्यपरिणाम आहेत ते दहा पट असतात म्हणजेच 100/रुपय होत असतात समाज व्यवस्था नीट सांभाळण्यासाठी.
संचार बंदी च्या काळात जे लोक शुद्धीत नियम पाळत नाहीत ते धुंदीत नियम पाळतील का? नक्कीच नाही. यामुळे पोलीस यंत्रणेवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होऊ शकेल कारण मंदी पाठोपाठ लॉकडाऊन नक्कीच बेरोजगारांना गुन्हा करण्यासाठी व्यसन बळ-डेरींग देईल आपल्या माहितीच आहे .व्यसन व गुन्हा हे दोघे ही एकत्रच कार्य करतात आणि त्यामुळं परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता जास्त आहे.आरोग्य विभागावर याचा ताण नक्कीच वाढणार आहे, कौटुंबिक स्वास्थ बिघडणार आहे, आम्हाला येणार्या फोनवर माता -भगिनीचे म्हणणे आहे कि घरात शांतात असून नवऱ्याची -पोरांची आणि आमची ही व्यसन सुटली आहेत आम्ही व्यसनमुक्त होत आहोत, व्यसन एक मानसिक आजार आहे आणि त्यातून मुक्त होण्याकरिता मनोबल वाढवणे आवश्यक आहे आणि हा काळ व्यसनमुक्त होण्यासाठी उत्तम परिस्थिती उपलब्ध करून देत आहे त्याचे सकारात्मक परिणाम ही आज समाज दिसून येत आहेत.
व्यसनमुक्त समाज ही निरंतर चालणारी प्रकिया त्या अनुषंगाने सरकारने पाऊले उचलणे आवश्यक आहे, आज राज्य सरकार पूर्ण पणे आर्थिक अडचणीत असताना वाईन शॉप सुरु करून नक्कीच मसुलातील तूट काही प्रमाणात भरून निघेल पण त्यापेक्षा सरकारने जर चैनीच्या उत्पादवावर केवळ 1-2% जरी कर वाढविला, आमदार निधी रद्द केला तरी दारू पासून मिळणाऱ्या महसुलातील तूट भरून निघू शकेल. अशी सूचना नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज् आणि व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंच यांनी वेळोवेळी राज्य सरकार कडे निवेदन देऊन केली आहे.
वाईन शॉप सुरु करून त्याचे होणारे दुष्परिणाम महसूल मिळकती पेक्षा ही जास्त असतील.राज्य शासन व्यसनाच्या व्यापारातून राज्य चालवते ही बाब सभ्य, सुसंस्कृत व प्रगतीशिल सामाज्यासाठी योग्य नाही, हे नीतिमत्ता चे पुराण नसून राज्यशासनाचे नितिमान कर्तव्य आहे.
दारूच्या मसूलावर जो पर्यंत आपण अवलंबून असू तो पर्यंत आपण सर्वांगीण विकास साध्य करू शकत नाही त्यासाठी शासनानी दीर्घकालीन उपाययोजना करने आवश्यक आहे. बिहार राज्याने दारूबंदी करून व्यसनमुक्त समाज निर्मिती च्या दिशेने एक क्रांतीकरी पाऊल उचलले आहे ज्याचे सकारात्मक परिणाम बिहार मध्ये दिसून येत आहेत आपण व्यसनमुक्त महाराष्ट्राच्या निर्मिती साठी सकारात्मक पाऊल उचलून महाराष्ट्राचा गौरव वाढवावा ही नम्र विनंती.
खालील काही उपाययोजना आम्ही या निवेदनाद्वारे आपणास सुचवत आहोत आपण या बाबत सकारात्मक विचार कराल यावर आमचा विश्वास आहे
१) कोरोनाचे संकट राज्यावर असेपर्यंत कितीही दडपण आले तरी दारुची दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेऊ नये.
२) गुटखा बंदी असूनही गुटखा सर्वत्र उपलब्ध आहे व तंबाखूजन्य पदार्थ जास्त दराने विकले जात आहे ,थुंकी ही कोरोना प्रसाराला पूरक असल्याने गुटखा तंबाखू विकणाऱ्या किराणा दुकाने लॉक करावीत व गुटखा वाहतुकीवर लक्ष ठेवावे
३) या काळात व्यसनी लोकांचे समुपदेशन करण्यासाठी ठोस यंत्रणा उभी करावी.
४) उत्पादन शुल्क विभागाच्या नियमांची कडक अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे.
५) हायवे लगतची दारु दुकाने व रेस्टॉरंट व बार ही बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा
आपले विनीत,
व्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय मंच
अविनाश पाटील (अ. नि. स. राज्य कार्याध्यक्ष)
वर्षा विद्या विलास (न.मं. म.रा. )
अमोल स. भा. मडामे
(चिटणीस /मुख्य संघटक, न. मं. म. रा. )
हेरंब कुलकर्णी (सामाजिक कार्यकर्ता ) तृप्ती देसाई (भूमाता ब्रिगेड)
वसुधा सरदार (जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता ) पारोमिता गोस्वामी (श्रमिक एल्गार चंद्रपूर) महेश पवार (स्वामिनी दारूबंदी आंदोलन यवतमाळ)भाऊसाहेब येवले (व्यसनमुक्ती साहित्यिक )
अशोक सब्बन(भारतीय जनसंसद) प्रेमलता सोनुने (बुलढाणा दारूबंदी आंदोलन )
माधव बागवे (अ. नि. स. )
नवल ठाकरे (अ. नि. स.
Dr. Prabha Tirmare, Assot. Prof College of Social Work, Mumbai
Dr.sagar mundaha
Dr.subhangi parkar