मृणालताई गोरे-एक स्वयंभू ,स्वयंप्रकाशी लोकनेता.
आज आदरणीय मृणालताई गोरे यांची 92वी जयंती .त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन !
मृणालताई म्हणजे एक स्वयंभू ,स्वयंप्रकाशी लोकनेता.
सामान्य माणूस मृणालताईंना पाणीवाली बाई म्हणून ओळखतो.पण त्यांची ओळख फक्त पाणी प्रश्नाशी संबधित नसून ,त्यांचे कार्य सर्व सामान्य माणसांच्या दररोजच्या समस्यांशी मग तो महागाई, निवारा, रोजगार, शिक्षण,आरोग्य ,स्त्रियांवरील अन्याय , अत्याचाराचा असो अथवा आदिवासी, दलित ,बहुजन समाजाचा जगण्याच्या लढाईतला असो प्रत्येक समस्यांशी निगडीत आहे. समस्यांच्या मुळापर्यंत जाऊन संविधानिक मार्गाने त्या समस्या दूर करण्यासाठी लोकांना सोबत घेऊन ,संघटन करून ,विविध कल्पक आंदोलने त्यांनी केली .
रसत्ताबदल हा शांततेच्या ,मतदानाच्या मार्गाने करावा, राज्य्कारभार व शिक्षण लोकभाषेतून चालावे , मागास जाती जमातींना विशेष संधी मिळावी, राजकीय आणि आर्थिक सत्तेचे विकेंद्रिकरण व्हावे, स्त्रियांवरील बंधने दूर होऊन त्यांना स्वतंत्र व्यक्ती म्हणून जीवनाच्या सर्व क्षेत्रात बरोबरीने वावरता यावे हा त्यांचा विचार आजही खूप मोलाचा आहे .या आधारे समाजपरिवर्तनाची प्रक्रिया गतिमान करता येईल असा आशावाद त्यांच्याठायी अगदी शेवटपर्यंत होता .
तरूण -तरूणी भावी काळात समाजपरिवर्तनाची चळवळ तेजस्वी बनवायला पुढे सरसावतील असा विश्वास त्यांना होता .आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांचे स्वप्न, त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्याचे प्रयत्न करण्याचे ठरवून आपल्या कार्याला गती देऊया.